Saturday, 25 January 2020

राजकारणावर बोलू काही...


         "किती रे राजकारणावर बोलतोस..?",  "सोशल मिडियावर राजकारणाबद्दल काही लिहीत जाऊ नकोस...", "राजकारणावर बोलून, लिहून तुला काय मिळणार आहे का मोदी तुला काही देणार आहे...???", आणि मग येतो शेवटचा प्रश्न "अरे असं काही लिहीत जाऊ नकोस, मार खायचाय का तुला..???" असे अनेक प्रश्न मला विचारले जातात घरच्यांकडून आणि मित्र मंडळींकडून... अर्थात त्यात सूर हा काळजीचाच असतो. काही चुकीचं घडू नये हाच हेतु ह्या प्रश्नांमागे, समज किंवा दम म्हणा ह्या मागे नेहमी चांगलाच हेतु असतो. पण मग मला एक प्रश्न पडतो की मग समोर एखादी चुकीची घटना घडत असेल तर त्यावर बोलायचंच नाही का...??? अर्थात त्या माझ्या मते जी घटना चुकीची आहे त्याचे अनेक पैलू असू शकतात आणि तीच घटना दुसऱ्यासाठी योग्य असू शकते. पण म्हणून त्याबद्दल बोलायचेच नाही का...??? राजकारण असो की इतर कोणतीही गोष्ट...
         सुरवातच करायची झाली तर २०१४ मध्ये मोदी विरोधक ह्या कॅटेगरीमध्ये मी मोडत होतो. अर्थात काँग्रेसचा समर्थकही नव्हतो. काय राजकारणावर बोलून मिळणार आहे.. सगळे साले सारखेच ह्याचं विचारांचा... त्यामुळे कोण मोदी आला काय आणि गेला काय परिस्थिती जैसे थे च राहणार हा विचार अगदी मनात घट्ट होता... पण एक एक गोष्ट पुढे घडत गेली, वर्ष सरली आणि मोदी विरोधक ह्या कॅटेगरी मधून "मोदी भक्त" ह्या कॅटेगरी मध्ये अगदी सहज आलो आणि "नरेंद्र मोदी" नावाच्या व्यक्तीची एक वेगळी ओळख पटली... जी ओळख अजून बहुतांश लोकांना समजलीच नाहीये, कारण हा माणूस शब्दांपेक्षा कृतीतून जास्त व्यक्त होतो. आणि आम्ही फक्त त्याच्या शब्दांकडे लक्ष देतो. आता बस झालं मोदी पुराण आता मूळ मुद्द्याकडे वळूयात....
         ह्या मोदी नावाच्या माणसाला विरोध करण्यासाठी विरोधक अनेक डावपेच टाकत होते आणि अजूनही कटकारस्थानं सुरू आहेत... त्याबद्दल बोलणं म्हणजे संकटाला आमंत्रण देणं असंच आप्तांना वाटतं आणि त्यात काहीच वावगं नाही कारण त्यांना काळजी वाटते. तेही त्यांच्या जागेवर बरोबरच आहेत. पण चुकीच्या गोष्टी घडत असताना काही बोलायचंच नाही का...??? जर कोणाचं उत्तर असेल नाही तर I am Sorry... कोणी जर भारत तेरे टुकडे होंगे, हर घर से अफझल निकलेगा सारखे नारे देत असेल तर मी गप्प राहायचं...??? कोणी माझ्या दैवतांना उलटसुलट बोलत असेल तर मी गप्प राहायचं...??? का...??? आजही तो दिवस आठवतो जेव्हा JNU मध्ये दुर्गा मातेची तुलना वेश्येशी केली होती... का गप्प राहायचं...??? तुम्हांला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ह्याचा अर्थ असा नाही की आमच्या भावनांना ठेच पोहोचवाल. ह्या सगळ्या प्रकारानंतर "कोणीतरी" माझे कान उपटले होते... कोणी तरी षंढ येतात आमच्या आदीमतेचा इतका मोठा अपमान करतात तुमच्या तळपायाची आग मस्तकात का गेली नाही...??? थोडी ना तुम्हांला कुठे मोर्चा घेऊन जायला सांगितलंय, फेसबुक ट्विटर सारखी प्रभावी माध्यम आमच्याकडे असताना निषेधाचा एक शब्दही कोणी लिहू नये... त्यादिवशी त्या दुर्गामाते समोर उभे राहून कान पकडून माफी मागितली... तेच JNU चे षंढ आजही धुमाकूळ घालत आहेत तरीही आम्ही गप्पच बसायचं का...???
         जिथे जिथे आम्ही चुकीला चूक म्हणत नाही तिथे तिथे आमचं नुकसान आहे. आणखीन एक समज राजकारणावर बोलून काही मिळणार आहे का...??? माझा उलट प्रश्न आहे काही मिळणारच नसेल तर देशाच्या सरकारकडून तरी कशाला अपेक्षा ठेवता...??? निवडणूकीत सहभागी होऊन सरकार का ठरवता...??? किंवा राजकारणावर बोलून काही मिळायलाच हवं का...??? गेल्या सत्तर वर्षांमध्ये देशाचं खरं नुकसान जर कोणी केलं असेल ना तर ह्याच राजकीय उदासिनतेने... बोलून काय मिळणार आहे... तुम्ही कोणत्याही पक्षाचे समर्थक असा पण जर तोच पक्ष चुकीचं पाऊल टाकत असेल तर त्या पक्षाला जाब विचारता आला पाहिजे. हीच खरी राजकीय जागरूकता आहे. जी येणाऱ्या काळात गरजेची आहे. आजघडीला कोणताही राजकीय पक्ष धुतल्या तांदळासारखा स्वच्छ नाही. पण त्यातल्या त्यात better option निवडता यायला हवा.
         एका मोदी नावाच्या माणसाचा विरोध करण्यासाठी काही लोकं गुपचूप चिनी राजदूतांची भेट घेतात, देशाबाहेर पाकिस्तानी लष्करी आणि ISI च्या अधिकाऱ्यांशी गुप्त चर्चा करतात. ह्याचेच चेले पाकिस्तान जाऊन मोदीला हरवायला  उघड उघड मदत मागतात. पण आम्ही काय करायचं गप्प बसायचं... JNU मध्ये माझ्या देशाचे तुडके करण्याच्या घोषणा देणाऱ्याला बोलावून एक स्वघोषित हिंदुत्ववादी पक्ष त्याचा शाल नारळ देऊन सत्कार करतो त्यावेळी आम्ही काय करायचं तर गप्प बसायचं... एक ट्विटही कारायचा नाही, एक फेसबुक पोस्टही लिहायची नाही... पुन्हा आणखीन एक प्रश्न (ह्याला मी टोमणा समजतो.) तुझ्या एका पोस्टने, ट्विटने असा खुप मोठा बदल होणार आहे... तर माहितीसाठी सांगतो अरब देशांमध्ये काही वर्षांपूर्वी आंदोलनांची जी लाट आली त्यात अनेक सरकारे उलथवून लावली गेली त्याची सुरवातच मुळी एका ट्विटने झाली होती. अर्थात माझ्या पोस्टने काही मोठा बदल वगैरे होईल असं मला म्हणायचं नाहीये पण आज जर आम्ही काही बोललो नाही, त्या मोदी नावाच्या व्यक्तीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो नाही तर आज विरोध करणारे हे लोकं उद्या तुमच्याच पुढच्या पिढीला बोलायचं सोडा स्वतंत्र विचारही करू देणार नाही...


         काय रे आजकाल खूप मोदी भक्तीत बुडालेला आहेस...??? प्रश्नाचं उत्तर आहे तो माणूस आहेच तसा... जेष्ठ आणि अनुभवी पत्रकार भाऊ तोरसेकरांनी एका व्याख्यानात एक छोटीशी गोष्ट सांगितली होती ती थोडक्यात सांगतो. एका गावातल्या पाटलाची आई आजारी पडली आता तिला डॉक्टर कडे न्यायचं तर तो नदी पलीकडच्या गावात. त्यात रात्रीचा मिट्ट अंधारही आहे. पाटलाकडे चांगले पहिलवान गडी माणसं होती. त्यातील तिघांना सोबत घेऊन होडीने नदी पार करायचं ठरलं. ठरल्याप्रमाणे आलटून पालटून तिघेही व्हल्ले मारत होते पण समोरचा किनारा काही आला नाही. रात्र सरली  तांबडं फुटलं तेव्हा लक्षात आलं की आपण अजून ह्याच किनाऱ्यावर आहोत. कारण होडीचा दोर मागच्या झाडाला बांधला होता... गेली सत्तर वर्ष हा दोर सोडला नव्हता हे दोर सोडण्याचं काम हा मोदी नावाचा माणूस करतोय... मी तर म्हणेन त्याही पलीकडे जाऊन आणखीन एक मोठं काम मोदींनी केलय ते म्हणजे भारतीय समाजातून राजकीय उदासीनता घालवली... २०१४ च्या आधी फेसबुक प्रेमींचा अड्डा होता आज एक एक फेसबुक अकाउंट एक एक पक्ष कार्यालय आहे मग ते कोणत्याही पक्षाचं का असेना. जितका राजकारणाचा अतिरेक वाईट त्यापेक्षाही राजकीय उदासीनता वाईट. आज मोदींवर टीका करायच्या उद्देशाने का होईना लोकं राजकारणावर बोलत आहेत. एक राजकीय मंथन सुरू आहे. ह्या मंथनातून जसे संभ्रम रुपी हलाहल बाहेर काढण्याचा प्रयत्न होतोय तसंच अमृतरुपी सत्यही बाहेर येतच आहे.
         पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ ह्यांचे अनेक व्याख्यानं मी पहिली ऐकली आहेत. त्यातली त्यांनी सांगितलेली एक गोष्ट फार महत्वाची आहे... "बोलने का यही एक आखरी मौका बचा है, जिसे लिखना आता है वो लिखो, जिसे बोलना आता है वो बोलो, जिसे चिल्लाना आता है वो चिल्लाओ... पर जिसे कुछ भी नही आता उसने कम से कम एक काम करना है के जो चिल्ला रहा है उसके पिछे खडे रहो... उसे रोको मत..." तुम्ही भारतीय राजकारणाचा विचार कशाप्रकारे करता हे मला माहीत नाही. पण मी भारतीय राजकारणाचा विचार करताना तिसरे महायुद्ध हा विषय त्याला जोडून पाहतो. त्यामुळे सध्या देशात जी काही अनागोंदी माजवण्याचा प्रयत्न होतोय त्याचे अनेक गंभीर अर्थ समजतात... त्यामुळे माझं तरी मत असं आहे की, नरेंद्र मोदी नावाच्या माणसाच्या मागे ठामपणे उभे राहण्यातच भारताचं भलं आहे...
         जाता जाता... जेष्ठ पत्रकार पुष्पा त्रिलोकेकर ह्यांनी साधारणतः ७-८ वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका लेखातील काही ओळी आजही ठळकपणे आठवतात. पुष्पा त्रिलोकेकर ह्यांनी आचार्य अत्रेंच्या मराठा ह्या दैनिकात पत्रकारितेला सुरुवात केली होती आणि साडेपाच दशके त्यांचा पत्रकारितेचा अनुभव आहे. त्या त्यांच्या लेखात लिहितात. "तिसरे महायुद्ध आज जगाच्या उंबरठ्यावर उभे राहिलेले आहे, असं असताना भारतात घटनाविहीन अराजकं निर्माण झाली (आजची परिस्थिती काही वेगळी नाही.), तर ह्या तिसऱ्या महायुद्धाची रंगभूमी भारतीय उपखंड हीच असेल! कोण कुठे आहे, किती पाण्यात आहे याची विवंचना निव्वळ राजकारण म्हणून करायची नाही - त्या पाण्यात हा देश व देशातील माणसे आकंठ बुडताना आम्ही थंडपणे बघायचे का, हा खरा प्रश्न आहे..."

©सुमित शिर्के, खारघर

No comments:

Post a Comment

डुम्स डे किंवा अंतिम निर्णयाचा दिवस

Repost Original Date: 02 मार्च 2021            ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम हे तिन्ही अब्राम्हीक धर्म मानले जातात आणि ह्या तिन्ही धर्मांच्या उग...