गेल्या काही दिवसांपासून POK, गिलगिट-बाल्टिस्तान चा मुद्दा तापला आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तानमध्ये निवडणुका घेण्याचे आदेश पाकिस्तान सरकारला दिले. आणि तणावात भर पडली. हा संपूर्ण भाग मुळात भारताचा त्यावर भारताचा हक्क आहे. त्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानला POK चा ताबा सोडायचा धमकीवजा इशारा दिला. स्वातंत्र्यानंतरच्या काळात अशाप्रकारे पाकिस्तानला POK खाली करण्याचा इशारा देण्याची ही पहिलीच घटना. ह्यावरून समजत की भारत सरकार आता ह्यापुढे POK वरून कोणतीही तडजोड करणार नाहीये. भारतीय हवामान खात्याने गिलगिट-बाल्टिस्तानच्या हवामानाचा अंदाज (Weather Forecast) द्यायला सुरुवात केली. भारताची ही भूमिका जितकी पाकिस्तानला धक्कादायक होती त्यापेक्षा जास्त चीनसाठी धक्कादायक आहे.
कारण चीनचे सगळे व्यापारी आणि सामरिक हितसंबंध ह्या भागाशी जोडले आहेत. आणि ह्या भागाचा ताबा भारताकडे आला तर चीनची एकही सामरिक योजना कधीही पूर्ण होणार नाही. चीनची वन बेल्ट वन रोड (OBOR) ही महत्वाकांक्षी व्यापारी योजना ह्याच भागातून जाते. ह्याच OBOR चा भाग असलेली चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) ह्या योजनेत चीनने आजपर्यंत अब्जावधी रुपये गुंतवले आहेत. आणि ह्या महत्वाकांक्षी प्रोजेक्टसाठी POK आणि गिलगिट-बाल्टिस्तान वर पाकिस्तानचा ताबा असणे गरजेचे आहे. हे झाले व्यापारी हितसंबंध. आता सामरिक दृष्ट्या POK चा ताबा पाकिस्तानकडे दिसत असला तरि त्यावर अप्रत्यक्ष नियंत्रण हे चीनचेच आहे. येणाऱ्या काळात ह्या भागाचा ताबा फार महत्वाचा असेल. चीन आणि पाकिस्तानने भारताचे तुकडे करून भारताचा जास्तीत जास्त ताबा मिळवण्याची योजना कार्यान्वित केली आहे. त्याची सुरुवात काश्मीर पासून होणार आहे. त्यासाठी सामरिक दृष्ट्या गिलगिट-बाल्टिस्तान महत्वाचा भाग आहे. पण आता भारताने POK आणि गिलगिट-बाल्टिस्तानचा ताबा मिळवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. चीन-पाकिस्तानच्या मूळ योजनेलाच धक्का बसायला सुरुवात झाली आहे.
ह्याच एका कारणामुळे चीनने सिक्कीम मध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलाय. POK वरून भारताचं लक्ष वळवण्यासाठीच चीनने ही घुसखोरी केली आहे. ह्याआधी २०१७ मध्ये चीनी सैन्याने डोकलाम मध्ये ७३ दिवसांची घुसखोरी केली होती. भारतीय सैन्याने चिनी लष्कराला अडवून ठेवले होते.दोन्ही देशातील चर्चेनंतर दोन्ही सैन्याने त्या भागातून माघार घेतली होती. त्यानंतर जरी चीनने डोकलाम भागातील सैन्य तैनाती वाढवली होती पण घुसखोरीची घटना घडली नव्हती. पण आता घुसखोरी साठी चीनने जी वेळ निवडली ती महत्वाची आहे. ह्यापुढे POK चा घटनाक्रम अजून तापणार आहे. एकीकडे चीन इंडो-पॅसिफिक क्षेत्राला युद्धाच्या दरीत ढकलत आहे तर दुसरीकडे POK मध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. ही येणाऱ्या काळाची नांदी ठरते. कोरोनाचे संकट ही छोटे वाटेल असा घटनाक्रम येणाऱ्या काळात सुरू होऊ शकतो. भारतवर्षाच्या आणि भारतीयांच्या सर्वात मोठ्या परीक्षेचा काळ सुरू होतोय. भारतवर्ष आणि भारतीय संस्कृती ह्या संकटाला समर्थपणे पुरून उरणार आहे...
©सुमित शिर्के
खारघर
(सूचना: कृपया कोणीही ब्लॉग पोस्ट कॉपी पेस्ट करू नये. मूळ लेखात चुकीचे बदल करून कॉपी पेस्ट केल्यास त्यासाठी ब्लॉग जबाबदार राहणार नाही. तसेच कायदेशीर कारवाईचा मार्गही मोकळा असेल.)
