Friday, 30 October 2020

चीनविरोधातील व्यूहरचना भाग-१

            मागील लेखात आपण पाहिलं की तैवानप्रश्नी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आणि संपूर्ण जगभरात कशाप्रकारे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. चीन तैवानवर हल्ला करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. चीनने तैवान ताब्यात घेतला किंवा हल्ला जरी केला तर इंडो-पॅसिफिक क्षेत्रात मोठ्या संघर्षाला सुरूवात होईल. चीन स्वसमर्थ्याच्या अहंकारात इतका बुडाला आहे की चीनला आपल्याविरोधातील व्यूहरचनाही समजू शकत नाही.  तैवानवरील एक हल्ला चीनला विनाशाच्या वाटेकडे नेऊ शकतो. अशी काय व्यूहरचना केली आहे हे सांगण्याआधी काही गोष्टी स्पष्ट कराव्या लागतील. मागील आणि ह्या पुढील लेख लिहिताना गत तीन ते पाच महिन्यांच्या काळातील घटनांचा आधार घेतला आहे. त्याआधीच्या काळातही अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडून गेलेल्या आहेत. त्याचाही ओझरता उल्लेख आहे. दिवसाला जर १०० घटना घडत असतील तर त्यातील जास्तीत जास्त दहाच घटना आपल्यापर्यंत पोहोचत आहे. अजून महत्वाची गोष्ट अशी की दिवसागणिक नाही तासागणिक नाही तर मिनिटागणिक गोष्टी बदलत आहेत, घडत आहेत. त्यामुळे मी लिहिलेल्याच घटना घडतील किंवा तसे मानावे असा आग्रह नाही. पण सध्या समोर दिसणाऱ्या बातम्यांच्या, घटनांच्या आधारे समजलं ते लिहिण्याचा प्रयत्न आहे.


१)क्वाड-



            जपानच्या पुढाकाराने उभी राहिलेली भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया ह्या चार देशांची संघटना. आर्थिक ध्येय समोर ठेवून उभी राहिलेली संघटना सुरवातीच्या काळात कमालीची निष्क्रिय होती. ही संघटना म्हणजे पॅसिफिक आणि हिंदी महासागराच्या लाटांवरील फेस आहे,  अश्या शब्दांत चीन ह्या संघटनेची हेटाळणी करायचा. पण आज याच संघटनेने चीनच्या तोंडाला फेस आणलाय. चीनच्या सामरिक कारवाया वाढायला लागल्यानंतर क्वाडला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्याच्या काळात क्वाड हा चीनविरोधातील सर्वात प्रबळ सामरिक गट म्हणून समोर येत आहे. भारताने क्वाडमध्ये अधिक सक्रिय भूमिका घ्यावी अशी मागणी अमेरिकेच्या माजी लष्करी अधिकाऱ्यांनी केली होती. क्वाडला पूर्णपणे सक्रिय करण्यात भारताची आणि अमेरिकेची खूप मोठी भूमिका असून, ह्यामुळे चीन कमालीचा अस्वस्थ झाला आहे.

            भारताने क्वाडमधील आपला सहभाग अधिक सक्रिय केलेला आहे. सुरवातीच्या काळात फक्त भारत आणि अमेरिकेत होणाऱ्या मलबार युद्धसरावात पाच वर्षांपूर्वी जपानला आणि ह्यावर्षीपासून ऑस्ट्रेलियाला सहभागी करून भारताने तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. चीनबरोबरील तणाव वाढल्यानंतर हिंदी महासागर क्षेत्रातील मोक्याच्या जागी भारताने पाच देशांसोबत पाच स्वतंत्र युद्धसराव घेऊन भारताची भूमिका अधिक स्पष्ट केली. इंडो-पॅसिफिक क्षेत्राचा अभ्यास करताना ह्या पाच युद्धसरावांची पार्श्वभूमी पाहूया. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे ह्यांनी राजीनामा दिल्यानंतर जपानमध्ये नवीन सरकार अस्तित्वात आले. क्वाड अंतर्गत भारत-जपान सहकार्य अधिक भक्कम करणार असल्याचे प्रतिपादन जपानचे नवनिर्वाचित पंतप्रधान सुगा योशिहीदो ह्यांनी केले.


(आसियान देश)

            दरम्यानच्या काळात भारत आणि अमेरिकेत परराष्ट्रमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांची “टू प्लस टू” चर्चा पार पडली. त्या बैठकीत क्वाडला मजबुती देऊन इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील क्वाडच्या हालचालींना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच क्वाडच्या विस्तारावर दोन्ही देशांच्या नेत्यांचे एकमत झाले. आसियान देश क्वाडमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. आसियान ही आग्नेय आशियाई देशांची संघटना आहे. आसियान देश क्वाड मध्ये सहभागी होऊ नये म्हणून चीनने आसियान देशांना अनेक आमिषे दाखवायला सुरुवात केली. कोरोना व्हायरसला प्रतिबंध करणारी लस पुरवण्याचे तसेच व्यापारी सहकार्य वाढवण्याचे आश्वासन चीनने आसियान देशांना दिले. त्यासाठी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई ह्यांनी आसियान देशांचे दौरे केले. परंतु चीनचे हेही प्रयत्न विफल होताना दिसत आहेत त्यामुळे चीनने आता आसियान देशांना क्वाडच्या सहभागावरून धमक्या द्यायला सुरुवात केली आहे. भारत, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र सचिवांची बैठक पार पडली त्यात इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. फ्रान्स क्वाडमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे. त्याची सुरुवात म्हणजे भारत फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियासह इंडो-पॅसिफिक क्षेत्रात नौदल सराव करणार आहे. ६ ऑक्टोबर रोजी जपानमध्ये क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक पार पडली. ह्या बैठकीत साऊथ आणि ईस्ट चायना सी, तैवानचा समुद्र, हिंदी महासागर ते हिमालयापर्यंत सुरू असलेल्या चीनच्या विस्तारवादी भूमिकेवरून सज्जड इशारा देण्यात आला.


(६ ऑक्टोबर रोजी जपानमध्ये क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक पार पडली)

            भारत आणि अमेरिकेमध्ये “BECA” करार (Basic Exchange and Cooperation Agreement ) झाला आहे. ह्या कराराअंतर्गत भारत आणि अमेरिकेला एकमेकांच्या सॅटेलाईट्सची सहाय्यता घेता येणार आहे. ह्या कराराव्यतिरिक्त LEMOA (Logistics Exchange Memorandum of Agreement- 2016) आणि COMCASA (Communications Compatibility and Security Agreement - 2018) हे दोन करार काही वर्षांपुर्वीच झालेले आहेत. लॉजिस्टीक करारानुसार अमेरिका आणि भारताला एकमेकांचे लष्करी तळ वापरता येणार आहे. ह्या लॉजिस्टिक कराराचा क्वाड अंतर्गत खूप मोठा फायदा भारत आणि अमेरिकेला होणार आहे. COMCASA करारानुसार भारताला अमेरिकेकडून संपर्काची अत्याधुनिक साधनं मिळाली आहेत. तसेच संवेदनशील आणि महत्वाच्या माहितीची देवाणघेवाणही होणार आहे. ह्यासगळ्या गोष्टींचा फायदा क्वाडअंतर्गत कारवाई करताना लष्करी ताळमेळीच्या स्वरूपात दोन्ही देशांना होणार आहे. क्वाडमध्ये भारत आणि अमेरिकेच्या हालचाली निर्णायक असतील. अगदी कालपरवा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी एक अत्यंत सूचक विधान केले. “अमेरिका आंतरराष्ट्रीय स्तरावरील आव्हानांचा मुकाबला एकट्याने करू शकत नाही, ह्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज आहे.” असे विधान अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मॉर्गन ऑर्टागस ह्यांनी केले आहे.

            फ्रान्स आणि आसियान देश क्वाड मधील सहभागासाठी उत्सुक असताना रशियाची क्वाड बाबतची भूमिका ही महत्वाची असणार आहे. क्वाडच्या विस्तारात रशियाचे नाव कुठेच दिसत नसले तरीही रशिया चीनपासून असणारा धोका ओळखून आहे. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर फुटून वेगळे झालेल्या किरगिजीस्तान आणि कझाकिस्तानच्या संपूर्ण भूमीवरच चीनने दावा ठोकलाय. रशियाच्या अतिपूर्वेकडील भूभागावरही चीनचा डोळा आहे. रशिया चीनचे सगळे मनसुबे ओळखून आहे. त्यामुळे येत्या काळात रशिया क्वाडमध्ये सहभागी झाला तर तो चीनसाठी सगळ्यात मोठा झटका असेल. पुढील धोका ओळखून भारताने अमेरिकेप्रमाणेच रशिया, ब्रिटन आणि व्हिएतनाम सोबत लॉजिस्टिक करार केला आहे. ह्या करारानुसार भारताला आर्टिक्ट प्रदेशातील तसेच अतिपूर्वेकडील रशियाचे तळ उपलब्ध होणार आहेत. तसेच रशियाचा हिंदी महासागरातील वावरही वाढणार आहे. व्हिएतनामसोबत झालेल्या करारानुसार भारताच्या साऊथ चायना सी मधील हालचाली अधिक सुलभ होणार आहेत. भारत आणि जपानमध्ये झालेल्या आणखीन एका करारानुसार दोन्ही देशांचे सैन्य परस्परांचे लष्करी तळ तातडीच्या सैन्य तैनातीसाठी वापरू शकणार आहेत.

         आग्नेय आशियाई देशांपैकी व्हिएतनाम क्वाडमध्ये सहभागी झाल्यास इतरही देश क्वाडमध्ये सहभागी होतील. व्हिएतनाम हा साऊथ चायना सी क्षेत्रातील भारताचा सर्वात महत्वाचा आणि सर्वात जुना सहकारी. साऊथ चायना सी क्षेत्रातील पॅरासेल बेट आणि इंधनक्षेत्रावरून चीन आणि व्हिएतनाममध्ये जुने वाद आहेत. काही महिन्यापूर्वी चीनच्या युद्धनौकेने व्हिएतनामच्या गस्तीनौकेला धडक देऊन जलसमाधी दिली होती. त्यानंतर व्हिएतनामने भारत आणि जपानसोबत संबंध वाढवायला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली. मध्यपूर्वेतील इराणशी उघडपणे आणि तुर्कीशी छुप्यारीतीने सामरिक सहकार्य वाढवून चीनने युरोप टप्प्यात आणायचा प्रयत्न केला. पण जर फ्रान्स क्वाड मध्ये सहभागी झाला तर त्याचं अनुकरण ब्रिटन, जर्मनी आणि ग्रीस सारखे देशही करतील. आणि चीनच्या युपोपतील सर्व योजनांना मूठमाती मिळेल. क्वाडमध्ये युरोपीय देश, आसियान देश आणि रशिया सहभागी झल्यास ही संघटना एका क्षेत्रापूरती मर्यादित न राहता चीनविरोधातील जागतिक संघटना म्हणून उदयाला येईल. क्वाडच्या वाढत्या प्रभावामुळे चीन कमालीचा अस्वस्थ झाला आहे.

            क्वाडच्या स्वरूपात चीनविरोधात जी आघाडी उभी राहत आहे, ती उभारण्याचं श्रेय जपानला जातं. तर त्या आघाडीला संपूर्ण सक्रिय करून मजबुती देण्याचं श्रेय भारत आणि अमेरिकेला जातं. तैवानवर हल्ला करून युद्धाला सुरवात झालीच तर क्वाडच्या ह्या सामरिक शक्तीचा मुकाबला करणे चीन-पाकिस्तान-उत्तर कोरिया-इराण ह्या चांडाळचौकडीला अवघड जाणार आहे. खरंतर ह्या एकाच लेखात क्वाड आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्राचा अंतर्भाव करायचा होता. पण दोन्ही विषय एकाच लेखात लिहिले तर लेख फारच लांबलचक आणि रटाळ होईल. क्वाड आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्राला वेगळं करता येणार नाही. कारण क्वाडची निर्मितीच मुळी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील ध्येय धोरणांना सामोरे ठेवून झाली. विषय समजून घेण्यासाठीच ह्या दोन गोष्टींची वेगवेगळी मांडणी करत आहे. इंडो-पॅसिफिकचा अभ्यास करताना क्रा-कॅनल सारखा अत्यंत महत्वाचा विषय आपण पाहणार आहोत. त्यानंतर भारतीय उपखंड आणि भारतीय सीमांशिवाय चीनविरोधातील व्यूहरचना पूर्ण होऊ शकत नाही. हे जरी वेगवेगळे भाग, विभाग दिसत असले तरीही ह्या विभागांतील घटना एकमेकांशी जोडलेल्या आणि एकमेकांना पूरक अश्याच आहेत.

(२०१७ साली क्वाड देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीदरम्यानच्या ह्या फोटोला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती.)


©सुमित शिर्के

खारघर

Thursday, 29 October 2020

चीनची तैवानवरील हल्ल्याची मुहूर्तमेढ

                


            २०२० साल उजाडलं आणि सगळ्या जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला. चीनपासून सुरू झालेली ही साथ काहीच दिवसात संपूर्ण जगभरात पोहोचली. गेल्यावर्षी हाँगकाँगमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली त्यावरून जगाचं लक्ष वळवण्यासाठीच चीनने कोरोनाचा वापर केला. पद्धतशीरपणे हा व्हायरस जगभर पसरवला. एकप्रकारे चीनने संपूर्ण जगाला जैविक युद्धात ढकलले. इतके सगळे होत असतानाही गप्प बसेल तो चीन कुठला.? कोविड-१९ च्या संकटातही चीनच्या सामरिक हालचाली अजिबात कमी झाल्या नव्हत्या. मे मध्ये चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीची बैठक झाली. त्या बैठकीत चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी “तैवानवर हल्ला करण्याची हीच योग्य वेळ आहे”, असे प्रतिपादन केले. त्यांनतर इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील घटनाक्रमांना प्रचंड वेग मिळाला.



                  एकाचवेळेस चीनने साऊथ चायना सी आणि ईस्ट चायना सी मध्ये पाच ठिकाणी नौदल सराव सुरू केले. साऊथ चायना सी मधील युद्धात महत्वाचे ठरू शकणाऱ्या पॅरासेल बेटांवर चीनने बॉम्बर आणि लढाऊ विमानं तैनात केली. चीनने तैवानच्या समुद्रानजिक युध्दसरावांचा सपाटा लावला. ह्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने तैवानच्या आखातात युद्धनौकांच्या गस्ती वाढवल्या. साऊथ चायना सी मध्ये विमानवाहू युद्धनौका “युएसएस रोनाल्ड रिगन” ची तैनाती केली. तैवानने संरक्षणसिद्धता वाढवायला सुरूवात केली. तैवानच्या समुद्रात आणि साऊथ चायना सी क्षेत्रात एकाचवेळी चीन, अमेरिका आणि तैवानचे युद्धसराव सुरू होते. चीनचा युद्धसराव सुरू असताना पॅरासेल बेटांजवळून अमेरिकी युद्धनौकांनी गस्त घातली. ह्यामुळे चिडलेल्या चीनने अमेरिकेला लष्करी अपघाताची धमकी दिली. ह्यापुढे अमेरिकन युद्धनौकांनी अश्याप्रकारे गस्त घातली तर अमेरिकेच्या युद्धनौका चीनच्या युद्धासरावाच्या टप्प्यात येतील अशी धमकी दिली.


(युएसएस रोनाल्ड रिगन)

               चीनच्या धोक्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तैवाननेही संरक्षण सिद्धता वाढवली. चीनच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यासाठी हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्रूझ मिसईल्सची तैनाती केली. गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तैवान भेटीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अमेरिकेच्या आरोग्यमंत्र्यांनीही तैवान भेट देऊन अमेरिका तैवानप्रश्नी गंभीर असल्याचा इशारा चीनला दिला. ह्या सगळ्या घडमोडींनंतर चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या मुखपत्राने थेट तैवानच्या राष्ट्राध्यक्षा “त्साई-इंग-व्हेन” ह्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ह्या धमकीनंतर तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी एफ-१६ ह्या लढाऊ विमानांनी सज्ज असलेल्या लष्करी तळाला भेट दिली आणि तैवान प्रत्येक आव्हानाला तोंड द्यायला समर्थ असल्याचा खणखणीत इशारा चीनला दिला. 



               एकीकडे अमेरिकेसोबत द्विपक्षीय संबंध भक्कम करत असताना तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताबरोबरील संबंध वाढवायला सुरुवात केली. तैवानच्या मंत्र्यांनी भारताच्या मीडिया चॅनल्सना मुलाखती द्यायला सुरुवात केली. तैवानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त भारतीय मीडिया चॅनल्सनी जाहिराती प्रसिध्द केल्या. तैवानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त भारतीयांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादबद्दल तैवानी राष्ट्राध्यक्षांनी भारतीयांचे आभार मानले. ह्या गोष्टीवरून अस्वस्थ झालेल्या चीनने भारताला वन-चायना पॉलिसीची आठवण करून दिली. पण भारताने त्याला केराची टोपली दाखवून तैवानसोबत द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करण्याचे संकेत दिले. त्याची सुरुवात म्हणून तैवानसोबत व्यापारी करारांसाठी चर्चा सुरू केली. हे सगळे सुरू असताना चीनमधून बाहेर स्थायिक झालेल्या लोकशाही समर्थक गटाने चीनविरोधात उभ्या ठाकलेल्या तैवान आणि जपानचे भारताने नेतृत्व करावे अशी मागणी केली.

               इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनविरोधात वातावरण निर्माण होत असतानाच अमेरिकेने युरोपमध्येही चीनविरोधात आघाडी उघडली. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मायकल पोम्पिओ ह्यांनी तैवान प्रश्नावरून युरोपीय देशांसोबत चर्चेचा सपाटा लावला. युरोपात चीनविरोधात वातावरणनिर्मिती करायला सुरुवात केली. युरोपीय महासंघाचा भाग असणाऱ्या ‘झेक रिपब्लिक’च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने तैवानचा दौरा केला. ह्यावरून खवळलेल्या चीनने झेकला ह्याची जबर किंमत मोजावी लागेल अशी धमकी दिली. “चीन साऊथ चायना सीवर सांगत असलेला अधिकार आंतरराष्ट्रीय नियमांना धरून नाही. ह्या सागरी क्षेत्रातील वाहतुकीचे स्वातंत्र्य महत्वाचे आहे”, असे निवेदन संयुक्त राष्ट्रसंघात सादर करून जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटनने चीनला खडसावले आहे.



                इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील तणाव अगदी टोकाला पोहोचला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ह्यांनी चिनी नौदलाचा भाग असणाऱ्या मरिन कॉप्सला युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश दिलेले आहेत. ह्या मरिन कॉप्सने तैवान ताब्यात घेण्याची रंगीत तालीम सुरू केलेली आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील तैवान, जपान, व्हिएतनाम अश्या सर्वच देशांनी संरक्षणसिद्धता वाढवली आहे. ऑगस्टमध्ये अमेरिकेने जगातील सर्वात मोठा नौदलसराव मानला जाणारा “रिम ऑफ पॅसिफिक २०२०” आयोजित केला. त्यात १० देशांच्या २२ युद्धनौका आणि पाणबुड्या सहभागी झाल्या. चिनी लढाऊ विमानांच्या वारंवार होणाऱ्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर तैवानने लाईव्ह फायर युद्धसराव सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी चीनच्या माजी लष्करी अधिकाऱ्याने चीन तैवानवर हल्ला करण्यापासून एक पाऊल दूर असल्याचे वक्तव्य केले होते. चीनने तैवानवरील हल्ल्यासाठी वापरात येणाऱ्या लष्करी तळांवर ‘डीएफ-१७’ ही हायपरसॉनिक मिसाईल्स आणि ‘एस-४००’ ही प्रगत एअर डिफेन्स सिस्टीम तैनात केली आहेत. ह्यावरून चीन किती सज्ज आहे ह्याची कल्पना येईल.



               इतक्या सगळ्या घटना घडत असताना चीन तैवानवरील हल्ल्यासाठी एकाच गोष्टीमुळे थांबला आहे. ती गोष्ट आपल्या धोरणांना अनुकूल अशी घडावी ह्यासाठी चीन शक्य तितका आटापिटा करत आहे. आणि ती गोष्ट म्हणजे “अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीचा निकाल” अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला चीनकडून सर्वाधिक धोका असल्याचे विधान अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन ह्यांनी सप्टेंबरच्या सुरुवातीलाच केले होते. त्यानंतर चीन अमेरिकेतील निवडणुकीवर प्रभाव टाकत असल्याचे आरोप राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी वारंवार केलेले आहेत. If biden wins, china win असे वक्तव्य करून ट्रम्प ह्यांनी ह्या प्रकरणाची धार वाढवली. ही गोष्ट पटवून देण्यासाठी त्यांनी गतकाळातील एक गोष्टीचे उदाहरण दिले. जो बिडेन उपराष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी चीनच्या जागतिक व्यापारी संघटनेतील प्रवेशाला समर्थन दिले होते. त्याचे दुष्परिणाम अमेरिका आजही भोगत आहे. चीन हाच अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे वक्तव्य संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले ह्यांनी केले. निक्की हॅले ह्या कट्टर चीन विरोधक मानल्या जातात. अमेरिकेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हॅले ह्यांचे विधान लक्ष वेधून घेते.



               डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष होणे चीनच्या पुढील सामरिक योजनांना धोक्याचे आहे. त्यामुळे सायबरक्षेत्र आणि तर माध्यमातून चीन मोठ्या प्रमाणात हालचाली करत आहे. जो बिडेन जिंकावेत म्हणून चीनने योजना आखली आहे. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाले तर काय होईल ह्याची “झलक” गेल्या दोन-तीन महिन्यात ट्रम्प ह्यांनी घेतलेल्या निर्णयांमध्ये दिसते. अमेरिका तैवानला ६६ अत्याधुनिक “एफ-१६व्ही” ही लढाऊ विमान पुरवणार आहे. तैवानमधील पॅट्रीयॉट हवाईसुरक्षा यंत्रणा अद्ययावत करण्याचा तसेच पाणबुडीविरोधी टॉर्पेडो देण्याचा निर्णयही अमेरिकेने घेतला आहे. २.३७ अब्ज डॉलर्सची ४०० अँटिशीप “हार्पून” मिसाईल्स तसेच हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या १३५ मिसाईल्स तैवानला पुरवण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. हे अमेरिकेने तैवानला दिलेले आजपर्यंतचे सर्वात मोठे शस्त्रसहाय्य ठरते.


(ऐतिहासिक अब्राहम करार)

               फक्त इंडो-पॅसिफिकच नाही तर मध्यपूर्वेतील चीनच्या हितसंबंधांना धक्के देणारे निर्णय आणि घटना अमेरिकेने घडवून आणल्या. काही महिन्यांपूर्वी इराण आणि चीनमध्ये ४००अब्ज डॉलर्सचा व्यापारी करार झाला. करार जरी व्यापारी स्वरूपाचा असला तरीही त्यामुळे दोन्ही देशांना सामरिक फायदेच जास्त होणार होते. ह्या घटनेनंतर अमेरिकेने मध्यपूर्वेतील कारवायांना मोठ्या प्रमाणात गती दिली. सर्वप्रथम इस्त्रायल, यूएई आणि बहारिन मध्ये द्विपक्षीय सहकार्य करार घडवून आणला. गेल्या महिन्यात तीनही देशांमध्ये त्रिपक्षीय ऐतिहासिक “अब्राहाम करार” झाला. आता सौदीसहित इतर पाच ते सहा अरब देश इस्त्रायल बरोबर द्विपक्षीय सहकार्य करार करण्यासाठी उत्सुक आहेत. अमेरिका इराणविरोधात भक्कम आघाडी उभारत असतानाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी सौदीचे राजे सलमान-बिन-अब्दुल-अजीज-अल-सौद ह्यांच्याशी फोनवरून केलेली चर्चा लक्ष वेधून घेते. इराण-चीनबाबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ ह्यांनी इस्त्रायल आणि अरब देशांचे दौरे केले. अमेरिकेच्या हितसंबंधांवर कुठल्याही स्वरूपाचे हल्ले केले तर त्याच्या हजारपटीने तीव्र प्रत्युत्तर देण्याची धमकी अमेरिकेने इराणला दिली आहे.

               अमेरिकेने इराणविरोधात सामरिक हालचालींसोबतच आर्थिक निर्बंधांचे हत्यारही उपसले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने इराणवर लादलेल्या निर्बंधांची मुदत येत्या काही दिवसांत संपत आहे. इराणवरील निर्बंधांची मुदत वाढवण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने फेटाळला आहे. निर्बंध हटताच इराण मित्रदेशांकडून शस्त्र खरेदी करू शकतो. त्यामुळे इराणला शस्त्र विक्री करणाऱ्यांवर अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. इराणला जागतिक अर्थव्यवस्थेपासून तोडणाऱ्या आर्थिक निर्बंधांची घोषणा अमेरिकेने केली आहे. ह्या निर्बंधामुळे इराणचे जवळपास १५० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. इराणशी आर्थिक सहकार्य स्थापन करणाऱ्या चिनी कंपन्यांवरही निर्बंधांची तयारी अमेरिकेने केली आहे. अमेरिकेने हँगकाँगमधील ११ महत्वाच्या व्यक्तींवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे चिनी बँकांचे फार मोठे नुकसान झाले आहे.

               अमेरिकेने गेल्या दोन ते तीन महिन्यात घेतलेले हे निर्णय फक्त झलक आहेत ह्याची जाणीव चीनला आहे. जो बिडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यास चीनला प्रभाव वापरून अमेरिकेचे अनेक निर्णय बदलायला भाग पाडता येतील. पण ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यास अमेरिकेचे पुढील निर्णय, योजना चीनसाठी फार घातक ठरू शकतात. ट्रम्प येवो अथवा बिडेन चीन तैवानवर हल्ला करणारच आहे. पण ट्रम्प निवडून आल्यास चीनला मोठी घाई करावी लागेल. ३ नोव्हेंबर रोजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणूक असून ४ नोव्हेंबर रोजी निकालही येईल. अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्या निकालाचा दिवस इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील घडमोडींसाठी निर्णायक ठरणार आहे. तैवानवर हल्ला करून चीन तैवान ताब्यात घेऊ शकतो. कारण अमेरिकेने तैवानला शस्त्रसहाय्यचे निर्णय घेतले आहेत, त्याच्या अंमलबजावणीला निवडणूक निकाल आल्यानंतरच सुरुवात होणार. तैवानला शस्त्रसहाय्य मिळण्याच्या आत चीन तैवानचा घास गिळण्याचा प्रयत्न करणार. तैवानवरील हल्ल्यानंतर संपूर्ण जगात तिसऱ्या महायुद्धाचा शेवटचा भडका उडेल. त्यादृष्टीने चीनविरोधात मोठी व्यूहरचना सुद्धा झालेली आहे. त्याबद्दल लिहिण्यासाठी वेगळा लेख किंवा लेखमाला लिहावी लागेल. ह्या संपूर्ण व्यूहरचनेत भारत आणि अमेरिका ह्या दोन्ही देशांची फार मोठी भूमिका आहे. त्या व्यूहरचनेबद्दल नक्कीच लिहीन पण आता तरी शेवटचे निर्णायक पाच दिवस बाकी आहेत.


-सुमित शिर्के

खारघर.

डुम्स डे किंवा अंतिम निर्णयाचा दिवस

Repost Original Date: 02 मार्च 2021            ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम हे तिन्ही अब्राम्हीक धर्म मानले जातात आणि ह्या तिन्ही धर्मांच्या उग...