असा मी...


नाव : सुमित सुरेश शिर्के
जन्म : २८ ऑगस्ट १९९४
तिथी : श्रावण कृ सप्तमी, शके संवत १९१६ 
 धर्म-जात-पंथ : हिंदू 
 छंद : वाचन, लेखन आणि भटकंती
 कर्म : दी एक्सिडेंटल इंजिनिअर

                आता स्वतःबद्दल काय ते लिहायचं... मी असा, मी तसा... स्वतःच स्वतःची स्तुती काय करायची... पण ब्लॉग लिहितोय म्हंटल्यावर स्वतःबद्दल थोडंफार लिहावं लागतं. शास्त्र असतं ते.!! म्हणून विचार केला लिहावं थोडंफार स्वतःबद्दल. वय वर्षे २५... पण वयाचं काय घेऊन बसलात.. Age is just a number... आवड, छंद म्हणाल तर वाचन, लेेखन आणि भटकंती... लहानपणा पासूून वाचनाची आवड. ही आवड लागली दैनिक प्रत्यक्ष मुळे. वाचत राहिलो वाचता वाचता लिहायला शिकलो.. नंतर भटकायला लागलो... ह्या तीन गोष्टी आयुष्यात पाहीजेतच त्याशिवाय मजा नाही...
               हा ते मगाशी कर्म दी एक्सिडेंटल इंजिनिअर लिहिलंय... त्याचं असं झालं की गेल्या चार वर्षांमध्ये भटकायची इतकी सवय लागली आहे की बाकीच्यांसोबत मलाही प्रश्न पडलाय आपण इंजिनिअरिंग डिप्लोमा का केला...?? काही लोकं ह्यालाच Traveller सुद्धा म्हणतात.. पण आपल्याला इतकी high status language झेपत नाही.. आपण गावराणच बरे.. कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड ही सगळ्यात आवडत्या जागा... २०१६ मध्ये ट्रेनिंगसाठी कंपनीने फलटणला पाठवलं पण तिथे शनिवार रविवार इतकं फिरलो की सगळे विचारायचे काय रे ट्रेनिंगला गेला आहेस की फिरायला..??? अर्थात दोन्हींसाठी... मुंबईहुन निघतानाच कुठे कुठे भटकायचे ह्याची यादी तयारच होती. आज सगळे म्हणत आहेत ह्याचं लग्न लावून द्यायला हवं म्हणजे घरात बसेल... पण तो त्यांचा गोड गैरसमज आहे...
              असो... वाचनाची आवड म्हणजे दैनिक प्रत्यक्ष, कादंबरी, कथासंग्रह, माहितीपर वाचन, आणि इंटरनेटवर वेगवेगळ्या विषयांवर सर्चिंग... वाचनाची पहिली आवड लावली ती दैनिक प्रत्यक्ष ने... ती वाढवली शाळेच्या आणि कॉलेजच्या लायब्ररीने... एखादा ऑफ पिरियड मिळाला की लायब्ररी हेच आवडतं ठिकाण... त्यातही कॉलेजची लायब्ररी म्हणजे खजिना... किती पुस्तकं वाचली मोजली नाहीत... पण एकही दिवस असा गेला नाही की लायब्ररीत गेलो नाही... लिखाणाची सवयही दैनिक प्रत्यक्ष मुळे लागली. माझा पहिला लेख दैनिक प्रत्यक्ष च्या वाचकांच्या सदरात छापून आला होता... तिथून मग हळूहळू लिखाणालाही सुरुवर केली. ब्लॉग सुरु करण्यासाठी प्रवृत्त केले ते नोस्त्रदेमसने... त्याने इतक्या भन्नाट गोष्टींबद्दल भविष्यकथन करून ठेवलं आहे की लिखाण करायला मोह आवरला नाही.
                ब्लॉगचं नाव "भारतवर्ष" का...??? कारण एक गोष्ट लक्षात आली की माझा देश इतका महान आहे इतका सुंदर आहे पण त्याचे अनेक सुंदर पैलू आपल्याच देशातील लोकांना माहीत नाहीत. माझा धर्म - सनातन वैदिक हिंदू धर्म हा ह्या भूमीचा मूळ धर्म आहे. ह्या धर्मामुळेच ह्या भूमीला ओळख आहे आणि ती एकसंघ आहे. माझ्या मातृभू आणि माझ्या धर्माबद्दल लोकांना समजायला हवे त्यामुळे हा माझा खारीचा वाटा... इतक्या मोठ्या अनंतकोटी ब्रह्मांडांमध्ये ह्या वसुंधरा पृथ्वीवर जन्म मिळणे ही भाग्याची गोष्ट... त्यातही ह्या वसुंधरेवरील भारतवर्षात जन्म मिळणे ही त्याहून भाग्याची गोष्ट आणि ह्या वसुंधरेवरील भारतवर्षात हिंदू म्हणून जन्म मिळणे ही महतभाग्याची गोष्ट...
               आणि जाता जाता एकच गोष्ट सांगेल... एका व्यक्तिशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे.. ती व्यक्ती म्हणजे डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी...

No comments:

Post a Comment

डुम्स डे किंवा अंतिम निर्णयाचा दिवस

Repost Original Date: 02 मार्च 2021            ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम हे तिन्ही अब्राम्हीक धर्म मानले जातात आणि ह्या तिन्ही धर्मांच्या उग...