Monday, 18 July 2016

नॉस्त्रादेमसची भाकिते : फ्रेंच राज्यक्रांती

(Source: Internet) 

             अठराव्या शतकात इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल ह्या देशांनी युरोपबाहेर जगभर अनेक वसाहती उभारल्या होत्या. तिथे व्यापारवाढीच्या उद्देशाने अमाप संपत्ती गोळा केली होती. त्या काळात फ्रान्स सरंजामशाहीच्या जाचात अडकला होता. फ्रान्सच्या राजाने सरंजामांचे अधिकार एवढे वाढवून ठेवले होते कि ते कोणालाही जुमानत नव्हते. जनतेचे अनन्वित हाल चालू होते. व्यापार मंदावल्यामुळे व्यापारीवर्गही नाराज होता. एकूणच देश गरिबीकडे चालला होता.

(फ्रेंच विचारवंत रुसो, १७१२-१७७८)
(Source: Wikipedia, Internet)

              अशा परिस्थितीत देशातील बुद्धिजीवी वर्गाने सरंजामशाही विरोधात दंड थोपाटले. व्हॉल्टेअर (१६९४-१७७८), रुसो (१७१२-१७७८) ह्यांचे विचार सामान्य नागरिकांना प्रभावित करू लागले. रुसोने लिहिलेल्या 'सामाजिक करार' ह्या ग्रंथात आदर्श प्रजासत्ताक राज्यव्यवस्था कशी असावी याचे विवेचन केले आहे. परकीय आक्रमणांपासून संरक्षणाबरोबरच 'लोककल्याण' हेही शासनाचे महत्वाचे कर्तव्य आहे, सर्व नागरिक समान आहेत, हि तत्वे रुसोने मांडली. अशा सर्व घडामोडींमध्ये फ्रेंच नागरिकांच्या मनात राज्यव्यवस्थेविषयी आग धगधगत होती.

(फ्रान्सचा राजा सोळावा लुई)
(Source: Wikipedia, Internet)

              त्या आगीचा भडका उडाला तो फ्रान्स-इंग्लंडमध्ये झालेल्या युद्धातील(१७५७-१७६३) फ्रान्सच्या पराभवाने. शासकीय अधिकारी आणि सरंजाम भ्रष्टाचारात गुंतलेले. जनतेची अन्नान्न दशा झालेली. अशा परिस्थितीत राजा सोळावा लुई याने कर्ज फेडण्यासाठी नवीन कर लागू करण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु राजाची प्रत्येक विनंती फेटाळली गेली. राजा सोळावा लुई हा सत्प्रवृत्त, पापभीरू वृत्तीचा होता. पण त्याभोवती जमलेली मंडळी अत्यंत भ्रष्ट होती. अशा परिस्थितीत जनता हवीलदील होऊन रस्त्यावर उतरली. वातावरण खुपच तापले. परिस्थिती हाताबाहेर जाते असे समजल्यावर राजाने लष्कराला पाचारण केले. परंतु तोपर्यंत जनतेने फ्रान्समधील शस्त्रगारच लुटले. बेफाम झालेल्या जनतेला सबळ नेतृत्वच नव्हते. परिणामा सगळीकडे एकच हलकल्लोळ माजला होता. ह्या परिस्थितीचे वर्णन करताना नॉस्त्रादेमस दहाव्या शतकातील त्रेचाळीसाव्या चतुषेपदीमध्ये लिहितात-

        Too much good times, too much of royal goodness, 
        Ones made and unmade, quick, sudden, neglectful: 
        Lightly will he believe falsely of his loyal wife
        He put to death through his benevolence.
     
        "काळ चांगला आणि राजाही चांगल्या स्वभावाचा..
        मन खंबीर नसल्यामुळे अनेक निर्णय अयोग्य ठरतील.
        राणीवर विश्वास नसल्यामुळे तिच्यावर स्वैराचाराचे आरोप होतील.
         या कमकुवत मनोवृत्तीमुळेच त्याचा घात होईल."

(बॅस्टिल तुरुॉगावरील हल्ला. १४ जुलै १७८९)
(Source: Wikipedia, Internet)

              संपुर्ण फ्रान्स असंतोषाने धगधगत होता. पेटलेल्या समुदायाने बॅस्टीलच्या तुरुंगावर हल्ला करून तेथील राजकैद्यांना सोडवले. असंतोषाने झपाटलेल्या लोकांनी सरंजाम, सरदरांची भर चौकात हत्या केली. नॉस्त्रादेमस दुसर्‍या शतकातील सत्तावन्नाव्या चतुष्पदीमध्ये लिहितात-

     Before the conflict the great wall will fall,
     The great one to death, death too sudden and lamented,
     Born imperfect: the greater part will swim:
     Near the river the land stained with blood.
      
     "लढाईपुर्वीच भल्यामोठ्या भिंतीला पाडले जाईल.
       राजाचा वध केला जाईल.
       सगळीकडे हाहाकार; अनेकजण मारले जातील.
       नदीच्या परिसरातील भूमी रक्ताने माखेल."

           बॅस्टिलचा तुरूंग भिंतीमध्ये सुरूंग लावून फोडण्यात आला होता. तसेच बॅस्टिलचा तुरूंग पॅरिसमध्ये असून, हे शहर सीन नदीच्या काठानर वसलेले आहे. त्यामुळे वरील चतुष्पदीतील दोन्ही ओळींना समर्पक अर्थ आहे.
             सर्वत्र सुडाचे तांडव सुरू होते. फ्रान्समध्ये कुठेच कायदा, सुव्यवस्था उरली नव्हती. असेम्ब्ली, शासकिय अधिकारी आणि क्रांतीकारक नेते मिळून 'पॅरिस कम्यून' नावाचे व्यवस्थापक मंडळ उभारले गेले. मन मानेल तसे निर्णय घेतले जाऊ लागले. कोणाही प्रतिष्ठित माणसाला उचलायचं, त्याचावर सरंजामांना मदत करण्याचा, क्रांतीविरोधी असल्याचा आरोप करायचा आणि भरचौकात गिलोटिनवर त्याचे हात बांधून वाद्यांच्या कर्कश आवाजात त्याचे मस्तक धडावेगळे करायचे. हा रोजचा दिनक्रम झाला होता. हि परिस्थिती कधीना कधी आपल्यावरही ओढावेल, हे राजा सोळावा लुई याने ओळखले आणि राणीसह रातोरात पॅसिसमधून पळ काढला. त्याबद्दल नॉस्त्रादेमस नवव्या शतकातील विसाव्या चतुष्पदीमध्ये लिहितात-

By night will come through the forest of 'Reines,' 
Two couples roundabout route Queen the white stone, 
The monk king in gray in Varennes
Elected Capet causes tempest, fire, blood, slice.
   
"एक जोडपे रात्रीचा प्रवास करीत रेनच्या जंगलात पोहचेल.
राजाने धर्मगुरूचा राखाडी रंगाचा तर राणीने पांढरा रंगचा झगा परिधान केला.
व्हारेनचा जमाव त्यांना पकडेल.
शिक्षा होईल, सगळीकडे रक्ताचा सडा."

          हा प्रसंग २० जून १७९२ रेजी घडला. नास्त्रादेमसच्या मृत्युला सव्वादोनशे वर्ष उलटून गेल्यावरचा. ज्यावेळी राजाला पकडले गेले तेव्हा राजाने धर्मगुरूचा राखाडी रंगाचा तर राणीने पांढर्‍या रंगाचा झगा परिधान केला होता. सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे नॉस्त्रादेमसने रेनच्या जंगलाचा आणि व्हारेन खेड्याचा स्पष्ट केलेला उल्लेख, जिथे राजा आणि राणी पकडले गेले.
          पुढे नवव्या शतकातील चौतिसाव्या चतुष्पदीमध्ये लिहितात-
            
The single part afflicted will be mitred,
Return conflict to pass over the tile.
For five hundred one to betray will be titled
Narbonne and Salces we have oil for knives.

    "राजाच्या डोक्यावर प्रेजिअर मुकुट चढविला जाईल.
      परत आल्यावर संघर्ष सुरूच राहील...
      पाचशे फितुर देशद्रोही कट रचतील...
      नॉरबॉ आणि सोसे यांना फितवले जाईल..."

           राजाला पॅरिसमध्ये आणल्यावर त्याच्या डोक्यावर प्रेजिअर नावाची टोपी चढवली गेेली. (Mitred) प्रेजिअर नावाची लाल रंगाची टोपी पोप परिधान करीत असून संन्यास दर्शवते म्हणजे राज्याधिकार सोडण्याची राजाला जबरदस्ती केली होती. राजवाड्यावर आक्रमण  करणार्‍यांची संख्याही पाचशेच होती. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे राजाला वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या दोन व्यक्तींची नावेही नॉरबॉ आणि सोसे होती.  त्यांना वळवून राजाला देहांताची शिक्षा केली. हा सर्व घटनाक्रम नॉस्त्रादेमसनी सव्वादोनशे वर्ष आधी लिहून ठेवला होता. त्यावरून त्यांच्या साधनेचे महत्व कळते.

        (राजा सोळावा लुई ह्याला झालेली देहांताची शिक्षा)
             (Source: Wikipedia, Internet)
           
            २१ जानेवारी १७९३ रोजी लोकांसमक्ष भरचौकात गिलोटिनवर राजाचा वध करण्यात आला. फ्रेंच राज्यक्रांतीच्या इतिहासात काही नोंदी आढळतात. राजा गिलोटीनवर जात असताना त्याचे पाय लटपटू लागले. तेव्हा शेजारी असलेला धर्मगुरू त्याला म्हणाला. "राजा घाबरू नकोस. शांतपणे स्वर्गाच्या पायर्‍या चढ." आता आपण नॉस्त्रादेमसनी लिहिलेल्या दोन चतुष्पदी पाहू. चौथ्या शतकातील एकोणपन्नासावी चतुष्पदी-

Before the people blood will be shed,
Only from the high heavens will it come far: 
But for a long time of one nothing will be heard,
The spirit of a lone one will come to bear witness against it.

    "रक्ताचा सडा पसरेल...
     तो स्वर्गापासून खूपच थोड्या अंतरावर असेल.
     बराच काळ सगळीकडे भयाण शांतता पसरेल.
     पण एक आत्मा ह्या घटनेची साक्षीदार असेल."

          धर्मगुरूचे ते उद्गार आणि ह्या चतुष्पदीतील दुसरी ओळ ह्यामध्ये किती समानता आहे बघा. नॉस्त्रादेमस समाधी अवस्थेत सर्वकाही पाहत असत. त्यामुळे ते स्वतःला तर साक्षीदार समजले नाहीत ना? पहिल्या शतकातील सत्तावन्नावी चतुष्पदी-

The trumpet shakes with great discord.
An agreement broken: lifting the face to heaven:
the bloody mouth will swim with blood;
the face anointed with milk and honey lies on the ground.

"वाद्यांचा प्रचंड कर्कश कोलाहल...
करार मोडला जाईल; मुंडके स्वर्गाच्या दिशेने उंचावले जाईल.
ते मस्तक रक्ताने भरलेले असेल.
दुध आणि मधाने सिंचन झालेले मस्तक आता जमिनीवर पडले आहे"
      
           राजाला वधाच्या वेळी गिलोटीनवर चढवले गेले. वाद्यांच्या अपुर्व गोंधळात गिलोटिनचे अवजड पाते खाली आले. राजाचे शीर धडावेगळे होऊन पायर्‍यांवरून घरंगळत समोरील टोपलीत येऊन पडले. गिलोटिन चालवणार्‍याने टोपलीतील मस्तक केसांना धरून हवेत उंचावले. हे सर्व बघणार्‍यांनी विकृत आरोळ्या ठोकल्या. राजाचे मस्तक जमिनीवर फेकले आणि लोकांनी ते यथेच्छ तुडविले. राज्याभिषेकाच्यावेळी ज्या मस्तकावर दुध आणि मधाचा अभिषेक झाला होता, ते आता तुडवले जात होते. हा सर्व प्रसंग नॉस्त्रादेमसने सव्वादोनशे वर्षे आधीच लिहिला होता. राजाच्या वधानंतर राणीलाही देहांताची शिक्षा झाली आणि त्यानंतरचा नेपोलियनचा इतिहास सर्वश्रूत आहे.
            फ्रेंच राज्यक्रांतीत जसा रक्तपात आणि हिंसाचार घडला तसा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात घडला नाही. परंतु ह्या दोन्ही क्रांतींमध्ये साम्य आहे ते विचारांचे. रुसोच्या समानतेच्या तत्वाने भारतीय विचारवंताना प्रभावित केले. तिथेच भारतीय स्वातंत्र्यलढ्याची बीजे रोवली गेली. तसेच ह्या दोन्ही क्रांतीमध्ये आणखी एक साम्य आहे. ते म्हणजे नॉस्त्रादेमसने दोन्ही क्रांतींबद्दल केलेली ठळक आणि स्पष्ट भाकिते. आता आपण आपला मोर्चा भारतीय स्वातंत्र्यलढ्याकडे वळवूयात. पुढिल लेखात १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम....

Thursday, 14 July 2016

नॉस्त्रादेमसची भाकिते : भविष्यकथनाची पद्धत


Tripod seated at night in secret study
Only resting on the aerian saddle :
Tiny flame leaving the solitude
Make prosper what is not vain to believe.

       "सगळीकडे रात्रीची निरव शांतता पसरत आहे.
         मी एकांतात माझ्या अभ्यासिकेत आरामखुर्चीवर पहुडलोय.
         एक चिमुकली तेजोमय ज्योत अंधार्‍या भविष्यात एकटीच चमकताना दिसते आहे.
          माझी साधना व्यर्थ ठरली नाही.... "

          'सेंच्यरीज' ह्या ग्रंथातील गूढ भाषेत नॉस्त्रादेमसने रचलेली ही पहिली चतुष्पदी. नॉस्त्रादेमस रात्रीच्या निरव शांततेत अभ्यासिकेतील आरामखुर्चीत पहुडले आहेत. भविष्याचा संपुर्ण गोषावरा त्यांच्यासमोर आहे. मानवजातीच्या भविष्यातील पुढील अनेक संकटे त्यांनी पाहिली. ह्या चतुष्पदीतील 'तेजोमय ज्योत' म्हणजे 'मानवजातीच्या उद्धारासाठी झटणारे महान सत्पुरुष'. मानवजातीचे भविष्य संघर्षमय असले तरी मानवाच्या कल्याणाची योजनाही देवाने आधीच करून ठेवली आहे, हे समजल्यामुळे नॉस्त्रादेमस निश्चिंत आहेत. म्हणूनच ते पुढील ओळीत लिहितात, 'माझी साधना व्यर्थ ठरली नाही'.
            नॉस्त्रादेमस पुढील चतुष्पदीमध्ये लिहितात-
        The rod in the hands placed in the middle of Branches
        With the wave he moistens and the hem and the foot :
        A fear and voice trembling from the handles :
        Divine splendour. The divine is seated nearby.

       "समोरील पितळी परातीतील पाणी हातातील छडीने हलवले.
        तरंग निर्माण होऊन पाणी धूसर होत गेले.
        त्यात हळूहळू चलचित्रे दिसू लागली.
        संपुर्ण अभ्यासिका दाट धुक्याने भरली आणि शेजारी बसलेल्या देवदूताने दिसणार्‍या घटनांचे स्पष्टिकरण सांगितले."

             आपण  आधीच पाहिले आहे कि, जेरुसलेममधील गूढ ग्रंथ अचानक गायब झाले. त्या ग्रंथांमध्ये परातीत पाणी किंवा तुप ओतून भविष्य पाहण्याची गूढविद्या होती. जेरुसलेमच्या पाडावानंतर तेथील ज्यू लोक इतरत्र स्थलांतरीत झाले. नॉस्त्रादेमस हे ह्याच ज्यू लोकांचे वंशज होते. त्यांच्या आजोबांनी त्यांना दिलेला ग्रंथभांडार हा जेरुसलेमच्या मंदिरातील गूढ ग्रंथसंग्रह असावा, असे जाणकारांचे मत आहे.
             रोज मध्यरात्री ह्याप्रमाणे नॉस्त्रादेमस एकाग्र चित्ताने-समाधी अवस्थेत भविष्यात घडणारा घटनाक्रम बघून-समजून चतुष्पदी लिहीत. ज्याप्रमाणे भारतीय संस्कृतीमध्ये महर्षी तपसमाधी घेऊन सिद्धी प्राप्त करीत, तसाच काहीसा हा प्रकार. चतुष्पदी लिहिताना स्वतःच्या अवस्थेबद्दल नॉस्त्रादेमस लिहीतात. तिसर्‍या शतकातील दुसरी चतुष्पदी-
        The divine word will give to the substenance,
        Including heavenm earth, gold hidden in the mystic milk:
        Body, soul, spirit having all power,
        As much under its feet as the Heavenly see.

        "दैवी वाणी सार्‍या विश्वाला नियंत्रित करणारी...
         त्या गूढ शक्तीत (mystic milk) सर्वकाही...
         शरीर, प्राण, आत्मा त्या शक्तीने प्रेरीत...
         सारे विश्व माझ्या पायाशी......"
      
           दैवी वाणीचा उल्लेख पहिल्या ओळीत येतो.  अर्थात देवदूताने सांगितलेले सर्व भविष्य हे ईश्वरी इच्छेनुसार सांगितले आहे. त्या ईश्वरी इच्छेनुसारच विश्वामध्ये सर्वकाही घडते. दुसर्‍या ओळीतील गूढ शक्तीला नॉस्त्रादेमसने ग्रंथामध्ये अनेकवार 'नियती' संबोधले आहे. तिसर्‍या ओळीतील अवस्था समाधी अवस्था दर्शवते. समाधी अवस्थेत आत्मा शरीराबाहेर येऊन अंतराळात संचार करतो, असे योगसाधनेचे जाणकार सांगतात. तशीच काहीशी अवस्था नॉस्त्रादेमसची असावी म्हणून ते चौथ्या ओळीत लिहितात," सारे विश्व माझ्या पायाशी.."
          आपण ह्याआधी बघितलच आहे कि, नॉस्त्रादेमसनी सर्व भाकिते गूढ अर्थाने लिहिली आहेत. त्याबद्दलचं विश्लेषण स्वतः नॉस्त्रादेमसनी त्यांच्या मुलाला सेजरला लिहिलेल्या पत्रात दिले आहे. ते पत्र आपण थोडक्यात पाहूयात-
"प्रिय पुत्र सेजर,
     अनेक आशिर्वाद.
              तुझा जन्म ईश्वरी इच्छेनुसार खूपच उशीरा झाला आहे. माझ्या लिखाणाचं काम मी पुर्ण केलं आहे. तु जाणता होईपर्यंत मी ह्या जगात नसेल. म्हणून हे पत्रलेखन....
               मानवसमाजात घडणारे भविष्यकथन मी मुद्दाहून गूढ सांकेतिक भाषेत लिहिले आहे. त्याची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे, ह्या भविष्यकथनातील अनेक घटना सध्याच्या काळात(इ.स.१५५५) अगम्य आणि विक्षिप्त आहेत. त्यामुळेच हे लिखाण सध्याच्या राजसंस्थेला आणि धर्मसंस्थेला न पटणारे आहे. हे भविष्य सुसंगत आणि तारीखवार मांडले असते तर दुखावलेल्या ह्या संस्थांकडून माझे लिखाण नष्ट करण्यात आले असते आणि मला पाखंडी ठरवून जबरदस्त शिक्षा ठोठावली असती.
                दुसरे कारण म्हणजे, जर मी हे भविष्य सुसंगत आणि तारीखवार लिहले असते. ते चुकिच्या माणसाच्या हाती लागले, तर अनर्थ ओढावेल. तो धोका टाळण्यासाठी मी हे लिखाण गूढ भाषेत लिहीले.
                त्याचबरोबर तारीखवार काहीही न लिहिता त्या त्या दिवसाचे ज्योतिषी ग्रहभ्रमणाचे गणित मांडून लिहिले आहे. पण स्थळांचा आणि शहरांचा स्पष्ट उल्लेख आहे. हे ग्रहभ्रमणाचे गणित तोच ज्योतिषी उलगडू शकतो, ज्याच्या साधनेला दैवी उपासनेची जोड आहे. त्यामुळे कोणीही स्वार्थी मनुष्य स्वतःच्या फायद्यासाठी ह्याचा वापर करू शकणार नाही. 
                माझ्या लाडक्या पुत्रा, परमेश्वरी इच्छेने लिहिलेले हे लिखाण मी तुझ्या स्वधीन करत आहे. ह्यातील सर्व गोष्टींचे तुला व्यवस्थित आकलन होवो. त्यासाठी सर्वसमर्थ परमेश्वर तुला बुद्धी देवो. त्याच्यावर अढळ श्रद्धा ठेव. तुला सुखशांती आणि दिर्घायुष्य लाभो."
                 नॉस्त्रादेमसनी त्यांच्या पत्रामध्ये संपुर्ण विवेचन दिले आहे. त्यांच्या दोन्ही भीती सार्थच होत्या. गेलिलीओ गेलिलीने सुर्य पृथ्वीभोवती फिरतो ह्या पारंपारिक संकल्पनेला छेद देत पृथ्वी सुर्याभोवती फिरते ही संकल्पना मांडली होती. तेव्हाच्या धर्मसंस्थेने त्याला पाखंडी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली होती. आपल्याकडचे उदाहरण पहायचे झाल्यास संत तुकाराम महाराजांना रुढी विरोधात जाऊन लिखाण केल्यामुळे गाथा इंद्रायणी नदीत बुडवावी लागली होती. दुसरी भीती, चुकीच्या व्यक्तींकडून फायदा उचलला जाण्याची तर प्रत्यक्ष हिटलरने नॉस्त्रादेमसच्या भाकितांचा चुकीचा वापर केला होता. त्याबद्दल आणि चतुष्पदींमधील ग्रहभ्रमण गणिताचं विवेचन लेखमालेच्या ओघात पुढे येईलचं.
                आपण आता नॉस्त्रादेमसच्या भविष्यकथनाच्या पद्धतीचा अभ्यास केला. पुढे आपण फ्रेंच राज्यक्रांती, भारताचा १८५७चा स्वातंत्रलढा, दुसरे महायुद्ध, भारतीय नेत्यांबद्दलची भाकिते, तिसरे महायुद्ध आणि सर्वात महत्वाचे तिसर्‍या महायुद्ध काळातील नव्या सर्वसमर्थ भारतीय नेत्याविषयीच्या नॉस्त्रादेमसच्या भाकितांचा क्रमवार अभ्यास करणार आहोत. पुढील लेखात फ्रेंच राज्यक्रांती बद्दल पाहू. कारण फ्रेंच राज्यक्रांतीतूनच भारतीय विचारवंतांनी प्रेरणा घोतली आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याची पहिली ठिणगी पडली. तसेच नॉस्त्रादेमसनी फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल लिहिलेल्या चतुष्पदी खुप रोचक आहेत...
अंबज्ञ.

Tuesday, 12 July 2016

द्रष्टा ज्योतिषी : नॉस्त्रादेमस

             
        (मुलगा सेजरने काढलेले नॉस्त्रादेमसचे तैलचित्र)  
(Source: Wikipedia, Internet) 
             
             रोमन सैन्याने जेरुसलेमचा (प्राचीन शहर, सध्या इस्त्रायलची राजधानी) पाडाव केल्यानंतर केलेल्या विध्वंसात तेथील अनेक प्राचीन मंदिरे आणि अमुल्य गोष्टींचा नाश झाला. तेथील मुख्य मंदिराच्या गाभार्यात अत्यंत प्राचीन असे दुर्मिळ ग्रंथ मौल्यवान अशा भरजरी रेशमी बसनात काळजीपुर्वक बांधून ठेवले होते. ग्रीक, लेटिन, हिब्रु, अरबी, चीनी, संस्कृत भाषेतील वनस्पती आणि औषधाीशास्त्र, गुढविद्या, मंत्र-तंत्र, अतींद्रिय शक्ती वगैरे विषयांवरील हे ग्रंथ होते. तो ग्रंथसंग्रह एकाएकी नाहिसी झाला आणि नंतर त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही.
                सुमारे बाराव्या शतकात भटक्या ज्यू जमातींपैकी अनेक टोळ्यांनी युरोपच्या दक्षिण भागात विशेषतः स्पेनमध्ये वस्ती केली. या ज्यू जमातींकडे परंपरेने चालत आलेल्या अनेक गुढविद्या होत्या. त्यात वनौषधी, जडीबुटी, परातीत पाणी अथवा तुप ओतून त्यात भविष्यात घडणार्या गोष्टी पाहून भविष्यकथन करणे, काचेच्या गोलात (Crystal Ball) पाहून भविष्य सांगणे या विद्या परंपरेने चालत आल्या होत्या. सहाजिकच त्या टोळ्यांचे चांगलोच बस्तान जमले. परंतु चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात फादर फर्नांदो मार्तिनेझ या धर्मगुरूची एका अज्ञात इसमाने हत्या केली. तो अज्ञात इसम ज्यू होता, अशी आवई उठली आणि मग ज्यू कुटुंबांची ससेहोलपट सुरू झाली. त्यात एक कुटुंब होते डॉ. पिअरे नॉस्त्रादेन्ना ह्यांचे. ते फ्रान्समध्ये सेंट रेमी येथे स्थलांतरित झाले. त्यांची ओळख प्रख्यात डॉक्टर आणि निष्णात ज्योतिषी डॉ. डीन ह्यांच्याशी झाली. त्यांचा घनिष्ट स्नेहसंबंध जुळला आणि त्याचे पर्यावसन दोन्ही कुटुंबांचे नातेसंबंध जुळून येण्यात झाले. डॉ पिअरे ह्यांचा मुलगा जेक्विस आणि डॉ. डीन ह्यांची मुलगी रेनी हे विवाहबद्ध झाले.

(सेंट रेमी, फ्रान्स येथील नॉस्त्रादेमसचे जन्मस्थान)
(Source: Wikipedia, Internet)
  
              जेक्विस नॉस्त्रादेमस आणि रेनी ह्या दांपत्याला २३ डिसेंबर १५०३ रेजी जो मुलगा झाला, त्याचेच नाव आहे मायकेल नॉस्त्रादेमस. दोन्ही आजोबांनी नातवाची कुंडली मांडून भविष्य वर्तविले, "नॉस्त्रादेमस हा जगातील महान भविष्यवेत्ता होईल" लागलीच त्यांनी त्या दृष्टीने नातवाच्या शिक्षणाची तयारी केली.
       ज्योतिष, खगोलशास्त्र आणि गणित हे विषय नॉस्त्रादेमसच्या दोन्ही कुटुंबांमध्ये पुर्वापार होतेच. त्याचबरोबर रसायनशास्त्र आणि वनौषधीशास्त्राचे परंपरागत शिक्षणही सुरू झाले. सर्वात महत्वाचे म्हणजे नॉस्त्रादेमसच्या आईच्या वडिलांनी म्हणजेच मातुल आजोबांनी त्यांच्या घराण्यातील परंपरागत प्राचीन दुर्मिळ ग्रंथांचा संग्रह नातवासाठी खुला केला. वयाच्या सोळाव्या वर्षी नॉस्त्रादेमसने गुढविद्यांच्या अभ्यासाला सुरवात केली आणि सलग बारा वर्षांच्या अभ्यासाने नॉस्त्रादेमस गुढविद्यांमध्ये पारंगत झाला.

(सालोने, फ्रान्स येथील नॉस्त्रादेमसचे घर)
(Source: Wikipedia, Internet)

                फ्रान्समध्ये सालोने येथे नॉस्त्रादेमसने प्राचीन ग्रंथातील रचनेप्रमाणे घर बांधले. आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये ह्याच घरात त्याने 'द सेंच्युरीज' हा भविष्यकथन करणारा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये नॉस्त्रादेमसने अनेक चतुष्पदी रचल्या. शंभर चतुष्पदींचे एक शतक असे एकंदर १० शतके आहेत. अकराव्या शतकात दोनच आणि बाराव्या शतकात अकरा चतुष्पदी आहेत. ग्रंथाचे मुळ नाव 'प्रोफोतिक्स द मायकेल नॉस्त्रादेमस' असे आहे. परंतु कालांतराने 'द सेंच्युरीज' हे नाव रुढ झाले.
                नॉस्त्रादेमसने भाकिते करताना अनेक एनाग्रामचा (TOP-POT), तसेच अनेक सांकेतिक शब्दांचा वापर केला आहे. त्यामागे ही गुढविद्या कुणा अपरिपक्व मनाच्या माणसाच्या हाती लागून अनर्थ होऊ नये, हाच हेतू होता. काळाच्या ओघात नॉस्त्रादेमसने लिहिलेली अनेक भाकिते खरी ठरली. त्या घटना घडल्यावरच तत्संबंधीं नॉस्त्रादेमसच्या चतुष्पदींचा संपुर्ण अर्थ कळला.
               आता कोणालाही प्रश्न पडेल कि ब्लॉगचा विषय तर भारतवर्ष आहे,  मग भारताचा आणि नॉस्त्रादेमसचा संबंध काय? खरं तर, भारताचा आणि नॉस्त्रादेमसचा खुप मोठा संबंध आहे. सुमारे ५०० वर्षांपुर्वी लिहिलेल्या 'द सेंच्युरिज'मध्ये अनेक चतुष्पदींमधून भारतासंबंधी भविष्यकथन केले आहे. त्यातील काही घटना सत्यातही उतरल्या आहेत. विशेषतः तिसर्या महायुद्धादरम्यान आणि नंतर जगाला सावरण्याचे काम भारत करेल, असे अनेक उल्लेख केले आहेत. आपण त्यातील एकएक गोष्ट बघणार आहोत. पण त्याआधी आपल्याला नॉस्त्रादेमसच्या भविष्यकथनाच्य पद्धतीचा आणि इतर काही चतुष्पदींचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तेव्हाच आपल्याला भारताविषयीच्या चतुष्पदींचा खरा मतितार्थ समजेल.
      
टिप: http://www.nostradamus.org/ ह्या वेबसाईटवर संपुर्ण 'द सेंच्युरिज' ग्रंथ इंग्रजी भाषांतरामध्ये उपलब्ध आहे.

डुम्स डे किंवा अंतिम निर्णयाचा दिवस

Repost Original Date: 02 मार्च 2021            ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम हे तिन्ही अब्राम्हीक धर्म मानले जातात आणि ह्या तिन्ही धर्मांच्या उग...