(Source: Wikipedia, Internet)
रोमन सैन्याने जेरुसलेमचा (प्राचीन शहर, सध्या इस्त्रायलची राजधानी) पाडाव केल्यानंतर केलेल्या विध्वंसात तेथील अनेक प्राचीन मंदिरे आणि अमुल्य गोष्टींचा नाश झाला. तेथील मुख्य मंदिराच्या गाभार्यात अत्यंत प्राचीन असे दुर्मिळ ग्रंथ मौल्यवान अशा भरजरी रेशमी बसनात काळजीपुर्वक बांधून ठेवले होते. ग्रीक, लेटिन, हिब्रु, अरबी, चीनी, संस्कृत भाषेतील वनस्पती आणि औषधाीशास्त्र, गुढविद्या, मंत्र-तंत्र, अतींद्रिय शक्ती वगैरे विषयांवरील हे ग्रंथ होते. तो ग्रंथसंग्रह एकाएकी नाहिसी झाला आणि नंतर त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही.
सुमारे बाराव्या शतकात भटक्या ज्यू जमातींपैकी अनेक टोळ्यांनी युरोपच्या दक्षिण भागात विशेषतः स्पेनमध्ये वस्ती केली. या ज्यू जमातींकडे परंपरेने चालत आलेल्या अनेक गुढविद्या होत्या. त्यात वनौषधी, जडीबुटी, परातीत पाणी अथवा तुप ओतून त्यात भविष्यात घडणार्या गोष्टी पाहून भविष्यकथन करणे, काचेच्या गोलात (Crystal Ball) पाहून भविष्य सांगणे या विद्या परंपरेने चालत आल्या होत्या. सहाजिकच त्या टोळ्यांचे चांगलोच बस्तान जमले. परंतु चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात फादर फर्नांदो मार्तिनेझ या धर्मगुरूची एका अज्ञात इसमाने हत्या केली. तो अज्ञात इसम ज्यू होता, अशी आवई उठली आणि मग ज्यू कुटुंबांची ससेहोलपट सुरू झाली. त्यात एक कुटुंब होते डॉ. पिअरे नॉस्त्रादेन्ना ह्यांचे. ते फ्रान्समध्ये सेंट रेमी येथे स्थलांतरित झाले. त्यांची ओळख प्रख्यात डॉक्टर आणि निष्णात ज्योतिषी डॉ. डीन ह्यांच्याशी झाली. त्यांचा घनिष्ट स्नेहसंबंध जुळला आणि त्याचे पर्यावसन दोन्ही कुटुंबांचे नातेसंबंध जुळून येण्यात झाले. डॉ पिअरे ह्यांचा मुलगा जेक्विस आणि डॉ. डीन ह्यांची मुलगी रेनी हे विवाहबद्ध झाले.
(सेंट रेमी, फ्रान्स येथील नॉस्त्रादेमसचे जन्मस्थान)
(Source: Wikipedia, Internet)
जेक्विस नॉस्त्रादेमस आणि रेनी ह्या दांपत्याला २३ डिसेंबर १५०३ रेजी जो मुलगा झाला, त्याचेच नाव आहे मायकेल नॉस्त्रादेमस. दोन्ही आजोबांनी नातवाची कुंडली मांडून भविष्य वर्तविले, "नॉस्त्रादेमस हा जगातील महान भविष्यवेत्ता होईल" लागलीच त्यांनी त्या दृष्टीने नातवाच्या शिक्षणाची तयारी केली.
ज्योतिष, खगोलशास्त्र आणि गणित हे विषय नॉस्त्रादेमसच्या दोन्ही कुटुंबांमध्ये पुर्वापार होतेच. त्याचबरोबर रसायनशास्त्र आणि वनौषधीशास्त्राचे परंपरागत शिक्षणही सुरू झाले. सर्वात महत्वाचे म्हणजे नॉस्त्रादेमसच्या आईच्या वडिलांनी म्हणजेच मातुल आजोबांनी त्यांच्या घराण्यातील परंपरागत प्राचीन दुर्मिळ ग्रंथांचा संग्रह नातवासाठी खुला केला. वयाच्या सोळाव्या वर्षी नॉस्त्रादेमसने गुढविद्यांच्या अभ्यासाला सुरवात केली आणि सलग बारा वर्षांच्या अभ्यासाने नॉस्त्रादेमस गुढविद्यांमध्ये पारंगत झाला.
(सालोने, फ्रान्स येथील नॉस्त्रादेमसचे घर)
(Source: Wikipedia, Internet)
फ्रान्समध्ये सालोने येथे नॉस्त्रादेमसने प्राचीन ग्रंथातील रचनेप्रमाणे घर बांधले. आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये ह्याच घरात त्याने 'द सेंच्युरीज' हा भविष्यकथन करणारा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये नॉस्त्रादेमसने अनेक चतुष्पदी रचल्या. शंभर चतुष्पदींचे एक शतक असे एकंदर १० शतके आहेत. अकराव्या शतकात दोनच आणि बाराव्या शतकात अकरा चतुष्पदी आहेत. ग्रंथाचे मुळ नाव 'प्रोफोतिक्स द मायकेल नॉस्त्रादेमस' असे आहे. परंतु कालांतराने 'द सेंच्युरीज' हे नाव रुढ झाले.
नॉस्त्रादेमसने भाकिते करताना अनेक एनाग्रामचा (TOP-POT), तसेच अनेक सांकेतिक शब्दांचा वापर केला आहे. त्यामागे ही गुढविद्या कुणा अपरिपक्व मनाच्या माणसाच्या हाती लागून अनर्थ होऊ नये, हाच हेतू होता. काळाच्या ओघात नॉस्त्रादेमसने लिहिलेली अनेक भाकिते खरी ठरली. त्या घटना घडल्यावरच तत्संबंधीं नॉस्त्रादेमसच्या चतुष्पदींचा संपुर्ण अर्थ कळला.
आता कोणालाही प्रश्न पडेल कि ब्लॉगचा विषय तर भारतवर्ष आहे, मग भारताचा आणि नॉस्त्रादेमसचा संबंध काय? खरं तर, भारताचा आणि नॉस्त्रादेमसचा खुप मोठा संबंध आहे. सुमारे ५०० वर्षांपुर्वी लिहिलेल्या 'द सेंच्युरिज'मध्ये अनेक चतुष्पदींमधून भारतासंबंधी भविष्यकथन केले आहे. त्यातील काही घटना सत्यातही उतरल्या आहेत. विशेषतः तिसर्या महायुद्धादरम्यान आणि नंतर जगाला सावरण्याचे काम भारत करेल, असे अनेक उल्लेख केले आहेत. आपण त्यातील एकएक गोष्ट बघणार आहोत. पण त्याआधी आपल्याला नॉस्त्रादेमसच्या भविष्यकथनाच्य पद्धतीचा आणि इतर काही चतुष्पदींचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तेव्हाच आपल्याला भारताविषयीच्या चतुष्पदींचा खरा मतितार्थ समजेल.
टिप: http://www.nostradamus.org/ ह्या वेबसाईटवर संपुर्ण 'द सेंच्युरिज' ग्रंथ इंग्रजी भाषांतरामध्ये उपलब्ध आहे.


अंबज्ञ
ReplyDelete